महाराष्ट्र पोलीस दलाच्या शिरपेचातील अनेक मानाच्या न्यांपैकी एक म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगात असलेले पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा. फुलांची उपमा दिल्याप्रमाणे नाजूक व कोमल असलेल्या आणि पोलीस दलात नव्याने भरती झालेल्या महिलांना सह्याद्री प्रमाणे राकट आणि कणखर बनवून महाराष्ट्र पोलीस दलाची पहिली फळी तयार करण्याचे काम हे पोलीस प्रशिक्षण केंद्र सन १९६२ पासून अविरतपणे करत आहे.
प्रारंभ :
महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अंमलदारांना प्रशिक्षण देण्यासाठी, दिनांक १३ नोव्हेंबर, १९५९ नाहे. रोजीच्या शासन आदेशानुसार राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १, पुणे येथे दिनांक १ फेब्रुवारी, १९६० रोजी पासून प्रादेशिक पोलीस प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलं. परंतु राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक एकच्या विस्तारीकरणाच्या हेतूने, सदर प्रादेशिक पोलीस प्रशिक्षण केंद्र दिनांक १५ जानेवारी, १९६२ रोजी जुने सेंट पीटर स्कूल, खंडाळा येथे स्थलांतरित करण्यात आलं.
विस्तार :
आज पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा हे एकूण ४६.७७ एकर क्षेत्रावर पसरलेले असून, लोणावळा, खंडाळा व तुंगार्ली या तीन गावांच्या सीमेवर वसलेले आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या प्रशिक्षण केंद्राचा परिसर नैसर्गिक ओढे-नाले, धबधबे, पाण्याचे डोह यांच्यासह अनेक जातीच्या वृक्ष-वेली, फुलपाखरे, नानाविध पक्षी, वन्यजीव अशा निसर्ग विविधतेने नटलेला असून पावसाळ्यातील सतत बदलणारे निसर्गाचे मनमोहक रूप हळुवारपणे पसरणारी धुक्याची दुलई, धो धो बरसणारा अवकळा पाऊस आणि निळ्याशार आभाळात उंचवणारे सभोवतालचे हिरवेगार डोंगर हे पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या सौंदर्यात अजूनच भर घालतात.
प्रशिक्षणाविषयी :
प्रारंभापासून आजपर्यंत या प्रशिक्षण केंद्रांमधून पुरुष पोलीस प्रशिक्षणार्थीच्या ६९ आणि महिला प्रशिक्षणार्थीच्या एकूण २८ तुकड्या, पोलीस दलाचं ९ महिन्यांचं मुलभूत प्रशिक्षण घेऊन बाहेर पडल्या आहेत. प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थी आंतरवर्गामध्ये
मुख्य कायद्यांच्या अभ्यासासह फौजदारी लघु कायदे, पोलीस संघटन, पोलीस कार्यपद्धती, कायदा व सुव्यवस्था, न्यायसहायक विज्ञान, तपासामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, संगणक हाताळणी, सीसीटीएनएस या अद्ययावत संगणक प्रणालीचा वापर, अंगुलीमुद्रासाठीची AMBIS लॅब, सायबर सुरक्षा तसेच वैयक्तिक विकासासाठी आर्थिक साक्षरता, आर्थिक नियोजन, आत्मनिर्भरता इत्यादी विषयांबरोबरच मानवाच्या मनोव्यापारावर आधारित भावनिक प्रज्ञावंत हा विषय देखील शिकवला जातो. बाह्य वर्गामध्ये प्रशिक्षणार्थीना शारीरिक आणि मानसिक स्वास्थाकरीता कवायत, परेड, लाठी, शस्त्र यांचे तसेच स्वयंस्वरक्षणासाठी ज्युडो कराटे, स्विमिंग, कमांडो ट्रेनिंग दिले जाते. शस्त्राचा अचूक वापर करता यावा म्हणून त्यांच्याकडून गोळीबार सराव देखील करून घेतला जातो. अशा प्रकारे, पारंपारिक गुन्हेगारी बरोबरच आधुनिक गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाची पहिली फळी या ठिकाणी प्रशिक्षित केली जाते.
प्रशासन :
सदर पोलीस प्रशिक्षण केंद्राचा कारभार पाहण्यासाठी पोलीस अधीक्षक दर्जाचे प्राचार्य, पोलीस उपअधीक्षक दर्जाचे दोन उपप्राचार्य, आंतरवर्ग अभ्यासक्रमासाठी निशस्त्र पोलीस अधिकारी व विधी निदेशक, बाह्यवर्ग अभ्यासक्रम शिकवण्यासाठी सशस्त्र पोलीस अधिकारी व कवायत निदेशक, तसेच प्रशासकीय कामकाजासाठी मंत्रालयीन अधिकारी कर्मचारी भोजनालयासाठी स्वयंपाकी व मदतनीस तसेच सफाई कर्मचारी असे मिळून २४९ अधिकारी आणि कर्मचारी प्रशिक्षण केंद्रात कार्यरत आहेत.