खंडाळा प्रशिक्षण केंद्रात विविध आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे.
१ ) वसतीगृह :
प्रशिक्षणार्थीना वास्तव्यासाठी शिवनेरी आणि राणी लक्ष्मीबाई अशी दोन वसतिगृहे आहेत. त्यामध्ये एकूण ७२६ प्रशिक्षणार्थींना राहण्याची सुविधा आहे. प्रशिक्षणार्थींना सोलर वॉटर हीटर द्वारे चोवीस तास गरम पाणी उपलब्ध करून दिलं जातं. स्टेट बैंक ऑफ इंडिया लेडीज क्लब, मुंबई यांच्या वतीने पोलीस प्रशिक्षण केंद्रातील वसतिगृहं तसंच प्रशासकीय इमारत इत्यादी ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन्स व्हेंडर मशीन तसंच डिस्पोजल करिता आधुनिक तंत्राचा वापर करण्यात आलेले पॅडकेअर बीन्स बसविण्यात आल्याने सॅनिटरी नॅपकिन्समुळे होणारं प्रदुषण थांबून परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत झाली आहे.
२) तक्रारपेटी
प्रशिक्षणार्थीना त्यांच्या तक्रारी गोपनीय स्वरूपात मांडता याव्यात यासाठी वसतिगृह तसेच भोजनालय या ठिकाणी तक्रार पेटीची सुविधा करण्यात आली आहे. महिला पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकारी तक्रार पेटी उघडून त्यातील तक्रारींचे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली निवारण करण्याचं काम करतात.
३) भोजनालय :
एकावेळी ५६० प्रशिक्षणार्थी बसू शकतील असं दुमजली भोजनालय आणि आधुनिक यंत्रणेने सज्ज असं स्वयंपाक घर असलेल्या अन्नपूर्णा भोजनालयामध्ये प्रशिक्षणार्थीना चौरस आहार पुरविण्यात येतो. प्रशिक्षणार्थींना नाश्ता आणि जेवणामधून भरपूर प्रथिने, कर्बोदके आणि जीवनसत्वे मिळावीत यासाठी फळे, पालेभाज्या, मांसाहार, सलाड, दूध, अंडी, शेंगदाणा तसंच हळीवचा लाडू इत्यादी व्यंजनांचा समावेश जेवणामध्ये केला जातो. भोजनालयाचं व्यवस्थापन प्रशिक्षणार्थीच्या मार्फत केलं जातं. भोजनालयामध्ये विकत आणलेल्या किराणामाल व इतर साहित्य यांची रोजच्या रोज नोंद सॉफ्टवेअर द्वारे केली जाते.
४) भांडारगृह : प्रशिक्षणार्थीना दैनंदिन वापराच्या साहित्यासाठी प्रशिक्षण केंद्रात ना नफा, ना तोटा तत्त्वावर भांडारगृह उपलब्ध करण्यात आलेलं आहे.
५) आंतरवर्ग व्यवस्था :
आंतरवर्गासाठी ज्ञानप्रकाश स्वामी विवेकानंद, सावित्रीबाई फुले आणि महर्षी धोंडो केशव कर्वे असे चार विद्याभवन एकूण २२ वर्ग आहेत. आंतरवर्ग लॅपटॉप, टीव्ही स्क्रीन, व्हर्चुअल क्लासरूम साधनांनी सज्ज आहेत.
६) रात्रभ्यासिका व करमणूक प्रशिक्षणार्थीच्या वेळेचा सदुपयोग व्हावा म्हणून रात्रीच्या भोजनानंतर रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत त्यांची रात्र अभ्यासिका घेतली जाते व त्यामध्ये अभ्यासाबरोबर त्यांच्याकडून निबंध लेखन पत्र लेखन, अवांतर वाचन अशा प्रकारच्या इतर कृती घेऊन त्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर लक्ष केंद्रित केलं जातं. तसंच त्यांना आठवडयातून एकदा करमणूक म्हणून प्रेरणदायी चित्रपट दाखविला जातो.
७) इतर प्रशिक्षण प्रशिक्षणार्थीना यशदा, पुणे यांच्यावतीने व्यक्तिमत्व विकासासाठी ब्लेंडेड प्रशिक्षण व महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीकडील ऑनलाईन ई लर्निंग प्रशिक्षण दिलं जातं.
८) बाह्यवर्ग प्रशिक्षणासाठी विस्तीर्ण कवायत मैदान असून, खंडाळा येथे भरपूर पाऊस पडत असल्याने प्रशिक्षणात खंड नको म्हणून बाहयवर्ग प्रशिक्षणासाठी तब्बल बावीस हजार स्क्वेअर फुटांचं ड्रिल शेड उभारण्यात आलं आहे. मैदानाच्या बाजूने व ड्रिल शेडमध्ये शस्त्रांच्या माहितीचे तसेच पोलीस दलाविषयी माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. ऑब्स्टॅकल्स सरावासाठी स्वतंत्र मैदान असून बास्केटबॉल, कबड्डी, हॉलीबॉल या इतर खेळांसाठीची मैदानेही प्रशिक्षण केंद्रात आहेत. त्याचप्रमाणे प्रशिक्षणार्थीना पोहण्याचं व वाहन चालविण्याचं प्रशिक्षण दिलं जातं.
९) व्यायामशाळा :
पोलीस प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षक यांच्यासाठी दोन वेगवेगळ्या व्यायामशाळा पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये आहेत. नुकतेच जिल्हा क्रीडाविभागाकडून रुपये पाच लाख अनुदान प्राप्त करून पहिल्यांदाच प्रशिक्षणार्थीसाठी स्वतंत्र व्यायामशाळा उभारण्यात आली आहे. सदर व्यायामशाळेचं उद्घाटन मा. संजय कुमार, भापोसे, अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं आहे.
१०) ग्रंथालय : ५००० हून अधिक विविध विषयांच्या पुस्तकांचा समावेश असलेलं ग्रंथालय प्रशिक्षणार्थीसाठी प्रशिक्षण केंद्रामध्ये उपलब्ध आहे. सदर ग्रंथालय नवीन जागेत स्थलांतरित करून त्याचं उद्घाटन मा. संजय कुमार, भापोसे, अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं आहे.
११) मॉडेल पोलीस ठाणे : प्रशिक्षणार्थीना पोलीस ठाण्याचं दैनंदिन कामकाज कसं चालतं याचं प्रात्यक्षिक देण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये भेट आयोजित केली जाते. परंतु, पोलीस प्रशिक्षण केंद्रांतर्गत मॉडेल पोलीस ठाणे उभारण्यात येत असून लवकरच ते कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामध्ये पोलिसांच्या दैनंदिन कामकाजाचे विविध रजिस्टर, कक्ष, विभाग तसंच कामकाज व जबाबदाऱ्या यांची माहिती देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे.
१२) स्मृति संग्रहालय पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थीनी, प्रशिक्षण कालावधीत केंद्राबाहेरील विविध स्पर्धांमध्ये विजय मिळून प्राप्त केलेली सांधिक पदके, ढाली, चषक तसंच जुनी वाद्यं, स्मृतिचित्रं यांचं प्रदर्शन असलेलं स्मृती संग्रहालय पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात आहे.
१३) प्रेरणा स्थळे
देशभक्तीची प्रेरणा देणारा स्वातंत्रदेवीचा पुतळा, मनःशांतीचं दर्शन घडवून आणणारा गौतम बुद्धांचा पुतळा, मनःशांतीसाठी योग साधना करण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात असलेलं योग कुटीर, महिला पोलीस अंमलदाराचं आदर्श रूप दर्शविणारा पुतळा अशी अनेक प्रेरणास्थाने प्रशिक्षण केंद्राच्या शोभेत अमूल्य अशी भर टाकतात.
१४) वैद्यकीय सुविधा एक महिला वैद्यकीय अधिकारी आणि पाच वैद्यकीय कर्मचारी व २४ तास उपलब्ध असलेली रुग्णवाहिका, यांच्यासह बाह्यरुग्ण विभाग आणि १० बेडचा आंतररुग्ण विभाग यांनी सुसज्ज असा दवाखाना, पोलीस प्रशिक्षण केंद्रांमध्ये आहे. तसेच मानसेवी स्त्रीरोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ प्रत्येक आठवड्याला पोलीस प्रशिक्षण केंद्रांमध्ये वैद्यकीय सेवा देतात. प्रशिक्षण केंद्रातील सर्व अधिकारी, अंमलदार व प्रशिक्षणार्थीना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस देण्यात आलेले असून, प्रशिक्षणार्थीना सुरुवातीच्या काळातच धनुर्वाताची लस देण्यात आली आहे. दवाखान्यामध्ये अँटीव्हेनम लसीसह इतर आवश्यक औषधसाठा उपलब्ध असून प्रशिक्षणार्थींना विटामिन, झिंक आणि लोह यांच्या गोळ्या उपलब्ध करून दिल्या जातात. आवश्यकतेप्रमाणे प्रशिक्षणार्थीना बाहेरील रुग्णालयात उपचारांची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते. प्रशिक्षणार्थीची बी. एम. आय आणि हिमाग्लोबिनची तपासणी दरमहा केली जाते व आवश्यकतेनुसार संबंधित प्रशिक्षणार्थीकडे विशेष लक्ष दिले जाते.
१५) इमारती पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशासकीय इमारत, परिषद कक्ष, परिसंवाद कक्ष, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी दरम्यान वास्तव्यासाठी लोहगड विश्रामगृह, अधिकाऱ्यांसाठी हॉलिडे होम व अंमलदारांसाठी विश्रामधाम, पोलीस अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासाठी निवारा इमारत अशा विविध इमारती पोलीस प्रशिक्षण केंद्राची शोभा वाढवितात.
पर्यावरण पूरकता
१.महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेण्ट अथॉरिटी या संस्थेकडून सौरऊर्जा प्रकल्पाकरिता पोलीस प्रशिक्षण केंद्राला २५ लाख रुपयांचं अनुदान प्राप्त झालं असून त्याद्वारे प्रशासकीय इमारत व आंतरवर्गाच्या ठिकाणी सौर विद्युत ऊर्जा प्राधान्याने वापरली जाते.
२. तसेच वसतिगृहावर बसविलेल्या सोलर वॉटर हिटरद्वारे पाणी गरम करून ते प्रशिक्षणार्थीना चोवीस तास उपलब्ध करून दिलं जातं.
३. पोलीस प्रशिक्षण केंद्रात आजपर्यंत वेळावेळी पार पडलेल्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमातून शेकडो झाडांची लागवड करण्यात आलेली आहे.
४. टाकाऊ पासून टिकाऊ या उपक्रमा अंतर्गत पोलीस प्रशिक्षण केंद्रातील जुन्या साहित्यातून पालक प्रतिक्षालय आणि मॉडेल पोलीस ठाण्याचं काम करण्यात आलेलं आहे.जुन्या साहित्यातून पालक प्रतिक्षालय आणि मॉडेल पोलीस ठाण्याचं काम करण्यात आलेलं आहे.
५. पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पालापाचोळा इत्यादीचा वापर करून गांडूळखत प्रकल्प उभारण्यात आला असून त्याद्वारे गांडूळ खताची निर्मिती केली जाते.
६. वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिनमुळे पर्यावरणाचा -हास होऊ नये याकरता ती नाश करण्याची मशीन वसतीगृहात लावण्यात आलेली आहे.
७. कंपोस्टींग प्रोजेक्ट किचन वेस्ट – व जंगल वेस्ट यापासून सेंद्रीय खत निर्मिती करिता मशीन व इतर साहित्यासाठी रु. ५.९१ लाख निधी मंजूर झाले असून सदर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.
१. उत्कृष्ट प्रशिक्षण संस्था पोलीस प्रशिक्षण केंद्रास आतापर्यंत केंद्रीय गृहमंत्र्यांची उत्कृष्ठ प्रशिक्षण केंद्रासाठी ट्रॉफी सन २०१५-१६ व सन २०१८-१९ अशी दोन वेळा प्राप्त झाली आहे. तसेच प्रशिक्षण केंद्राला कलाम इनोवेशन इन गव्हर्नन्स अवार्ड सन २०१९ २०, स्कॉच अवार्ड साठी सन २०२० २१ करिता नामांकन प्राप्त झाले आहे आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची उत्कृष्ठ प्रशिक्षण केंद्रासाठी ट्रॉफी सन २०२०-२१ करिता प्रशिक्षण केंद्राने सहभाग नोंदविला आहे.
२. प्रशिक्षक प्रशिक्षण केंद्रांमध्ये नेमणुकीच्या
कालावधीत बऱ्याच पोलीस अधिकारी व अंमलदारांना आतापर्यंत राष्ट्रपती पोलीस पदक, पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
स्टेट बँकेकडून कौतुक –
पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या विविध उपक्रमांची दखल घेत स्टेट बँक ऑफ इंडिया व स्टेट बँक ऑफ इंडिया लेडीज क्लब यांच्या वतीने पोलीस प्रशिक्षण केंद्रास • सुमारे २० लाख रुपये किंमतीचे लॅपटॉप, सीसीटीव्ही कॅमेरे तसेच सॅनिटरी नॅपकीन डिस्पोजल मशीन नुकतीच भेट देण्यात आली आहे.
नावीन्यपूर्ण सेवांतर्गत प्रशिक्षण
१. स्वस्थ पोलीस, सशक्त पोलीस आणि सक्षम पोलीस प्रशिक्षण महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पोलीस निरीक्षक ते पोलीस उपअधीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक ते पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक ते सहायक पोलीस निरीक्षक अशा पदोन्नतीच्या टप्प्यावर असलेल्या किंवा पदोन्नत झालेल्या अधिकाऱ्यांना नवीन पदाच्या जबाबदाऱ्या आणि व्यक्तिमत्व विकास तसंच पोलीस दलासमोरील बदलती आव्हाने माहिती व तंत्रज्ञान, फॉरेन्सिक सायन्स, मोक्का कायदा आर्थिक गुन्हे तसंच भावनिक प्रज्ञावंत इ. बाबत अद्ययावत करणं यासाठी ‘स्वस्थ पोलीस सशक्त पोलीस आणि सक्षम पोलीस’ हा एक नावीन्यपूर्ण प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविला जातो. आतापर्यंत ४८१ अधिकाऱ्यांना या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आलं आहे.
२. डायल ११२ प्रशिक्षण भारत सरकार गृह विभाग प्रायोजित National Emergency Response Service च्या धर्तीवर Maharashtra Emergency Response Service अंमलबजावणी करण्यासाठी Mahendra Defence System Ltd. आपात्कालीन स्थितीमध्ये मार्फत पोलीस, अग्निशामन व अन्य सुविधांसाठी एकच डायल क्र. ११२ या बाबतचं प्रशिक्षण, आतापर्यंत एकूण ३६० प्रशिक्षणार्थीनी प्रशिक्षण घेतलं आहे.
- OPSU (Officer’s Professional Skill Upgradation) महाराष्ट्र राज्यातील सर्व पोलीस अधिकारी यांची व्यावसायिक क्षमता वाढविण्यासाठी Officer’s Professional Skill Upgradation हे नावीन्यपूर्ण प्रशिक्षण पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा येथे घेतलं जात.
कोविडच्या अनुषंगाने काळजी :
कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सर्वत्र शारीरिक अंतर ठेवले जाते. मेस, होस्टेल व आंतरवर्ग या ठिकाणी ५० % आसनक्षमता वापरली जाते. सर्व बैठक व्यवस्था वारंवार सोडिअम हायपोक्लोराईडने निर्जंतुक केली जाते. हँड वॉश व सॅनिटायझरचा वापर केला जातो.
नियोजित विकास प्रकल्प :
पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या विकासासाठी पुढील कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, प्रशिक्षण केंद्राच्या राष्ट्रीय महामार्ग क्र ४ लगत असलेल्या जागेत पोलीस कल्याण निधी द्वारा संचलित हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड कंपनीचा पेट्रोलपंप सुरू करणे, अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी ७५ निवासस्थानांचं बांधकाम, वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी यांच्या विश्रामगृह, प्राचार्य निवासस्थान नूतनीकरण, क्रीडा संकुल (इनडोअर व आउटडोअर), प्रशिक्षणासाठी येणाऱ्या वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी यांच्यासाठी वसतिगृह (३० खोल्या), कवायत मैदानाचे विस्तारीकरण, लोहगड रेस्ट हाऊस नुतनीकरण, जलतरण तलाव, वॉच टॉवर, ग्रंथालयासाठी फर्निचर, हॉलिडे होमचं नूतनीकरण इत्यादीबाबत कामकाज प्रगतीपथावर आहे..
महाराष्ट्र पोलीस दलाच्या शिरपेचातील हा मानाचा तुरा, पोलीस दलाचं नाव उज्वल करण्यासाठी प्रशिक्षण क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी करीत आहे. हे प्रशिक्षण केंद्र पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांना उत्कृष्ट दर्जाचं प्रशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये सेवाभावी वृत्ती निर्माण करण्यासाठी आणि ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीद वाक्याप्रमाणे कटिबद्ध असलेली महिला पोलिसांची तुकार करण्यासाठी आणि त्याद्वारे महाराष्ट्र पोलीस दलाचा लौकिक वाढविण्यासाठी अखंड कार्यरत आहे.