मुंबई : गतवर्षीच्या मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेला अखेर न्याय मिळाला. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. या प्रकरणाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा वेगवान तपास आणि तपासाच्या कामात आधुनिक पद्धतींचा वापर. राज्यभरात गाजलेले साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरण हा अमानुषतेचा कळस होता. या प्रकरणाची तुलना थेट २०१२ मध्ये दिल्लीत झालेल्या निर्भया प्रकरणाशी केली गेली.
काय होते हे प्रकरण?
गतवर्षी गणेशोत्सवाच्या काळात १० सप्टेंबरच्या मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास हा क्रूर प्रकार घडला. पीडिता आरोपीला भेटल्यावर त्यांच्यात आधी शाब्दिक वाद झाला. त्यानंतर आरोपीने तिला मारहाण केली. या मारहाणीत ती बेशुद्ध पडली. त्यानंतर आरोपीने तिला फरफटत एका टेम्पोजवळ नेले. टेम्पोत तिच्यावर अमानवी अत्याचार केला. नंतर तिला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून आरोपी तिथून पळून गेला.
हा सगळा प्रकार जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. खैरानी मार्गावरील एका कंपनीतील सुरक्षा रक्षकाने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून एका स्त्रीला बेदम मारहाण होत असल्याचे सांगितले. पोलीस (maharashtra police) केवळ १० मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. तेव्हा त्यांना पीडिता एका टेम्पोमध्ये बेशुद्धावस्थेत आढळली. तिची परिस्थिती अत्यंत गंभीर होती.
मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होऊन आतडी बाहेर निघाली होती. प्रत्येक सेकंद मोलाचा होता. अॅम्ब्युलन्स वगैरे बोलवण्याची वाट न पाहता पोलिसांनी त्याच टेम्पोने तिला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र दुसऱ्या दिवशी उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. प्रकरणाच्या जलद तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली गेली व डी एन नगर विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त ज्योत्स्ना रासम यांची विशेष तपास अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली.
पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत घटना घडल्यानंतर काही तासांच्या आत उत्तरप्रदेशातील आपल्या गावी पळून जाण्याच्या बेतात असलेल्या आरोपीला अटक केली. यानंतर प्रकरणाचा तांत्रिक व शास्त्रीय तपास कौशल्याने आणि परिपूर्णरीत्या करून विशेष तपास पथकाने बंदोबस्ताच्या जोडीने उत्सवाच्या काळातही दिवसातून १८ तास काम करत, केवळ १८ दिवसांमध्ये आरोपीविरोधात प्रकरणाच्या जलद तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली.
न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणी ३७ साक्षीदार तपासले गेले. या संवेदनशील प्रकरणात या साक्षीदारांना न्यायालयासमोर हजर करणे आणि त्यांनी निर्भीडपणे साक्ष देणे या गोष्टीही महत्त्वपूर्ण ठरल्या. याखेरीज रस्त्यावर राहणाऱ्या या पीडितेची ओळख पटवून तिच्या कुटुंबियांचा तपास करणे हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान होते. तेही त्यांनी यशस्वी पार पाडले.
घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत झालेले चित्रीकरण आणि वैद्यकीय अहवाल हेही पुरावा म्हणून सादर केले गेले. डीएनए चाचणी, तळहातांचे ठसे या चाचण्या करण्यात आल्या. सहायक पोलीस आयुक्त ज्योत्स्ना रासम यांनी ‘गेट अॅनालिसिस’चा म्हणजेच सीसीटीव्ही चित्रीकरण आणि आरोपीच्या अटकेनंतर त्याच्या चालण्याच्या पद्धतीचे केलेले चित्रीकरण यांच्या आधारे त्याच्या चालण्याच्या ढबीचे विश्लेषण करण्याच्या पद्धतीचा आधार घेतला. हे संपूर्ण प्रकरण म्हणजे दुर्मिळातील दुर्मीळ (Rarest of the rare) प्रकारात मोडणारा गुन्हा होता.
या खुनामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. मुंबई सत्र न्यायालयात पोलिसांनी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली होती. ही मागणी केल्यावर आरोपी सुरुवातीला न्यायालयातच रडू लागला होता. त्यानंतर त्याने शिवीगाळ करायलादेखील सुरुवात केली होती. परिणामी न्यायालयाला आरोपीला बाहेर काढावे लागले. सुनावणीदरम्यान पोलिसांनी या नराधम गुन्हेगाराला जगण्याचा कुठलाही अधिकार नाही असा युक्तिवाद केला. सरकारी वकिलांनीसुद्धा या आरोपीमध्ये कोणत्याही प्रकारे सुधारणा होणे शक्य नाही असे विधान केले.
या प्रकरणात सरकारी वकिलांनी पीडितेची बाजू संपूर्ण ताकदीने मांडत तिला न्याय मिळवून देण्याच्या कामी महत्त्वाची भूमिका बजावली. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर केवळ ६ महिन्यांत आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली गेली आहे. हा तपास डॉ. महेश्वर रेड्डी, भापोसे यांच्या मार्गदर्शनाखाली डी. एन. नगर विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त ज्योत्स्ना विलास रासम, साकीनाका पोलीस ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख, पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढुमे, सहायक पोलीस निरीक्षक सोहम कदम, अर्जुन कुदळे, हनुमंत धवन, पोलीस उपनिरीक्षक उमेश दगडे यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.