समोर ‘पोलीसवाले मुर्दाबाद’च्या घोषणा! PSI सुधीर वाघ यांनी काय केले पहा.

मुंबई : आपल्या कार्याने पोलीस दलात ठसा उमटवणारे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाघ (सेवानिवृत्त) त्यांचा खडतर प्रवास सांगत आहेत. ‘सन १९८१ मध्ये ठाणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलात सशस्त्र पोलीस शिपाई म्हणून माझी भरती झाली. दहा वर्षांनंतर जिल्हा अकोला येथे निःशस्त्र पोलीस अंमलदार म्हणून यशस्वीपणे प्रशिक्षण घेतलं. २०१३ मध्ये विभागांतर्गत स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मला पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्त केलं गेलं. ठाणे ग्रामीण, रायगड जिल्हा, पालघर जिल्हा या तीन ठिकाणी मी प्रदीर्घ सेवा केली.’

खाकीने मला स्थान दिला, समाजात मानसन्मान दिला. गुन्हेगारांशी दोन हात करण्याचं सामर्थ्य दिलं. समाजातील लोकांची सेवा करण्याचं भाग्य लाभलं. मुलांना चांगल्या शिक्षणाबरोबर चांगले संस्कार देता आले, संसाराचा गाडा आनंदात खेचला गेला.

पोलीस दलात नोकरी करत असताना कविता आणि लेखनाचा छंद जोपासला. तत्कालीन ठाणे ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विश्वास नांगरे पाटील यांनी माझ्या लिखाणाचे कौतुक केलं. एवढंच नाही तर त्यांनी स्वतः लिहिलेला लेख, ‘ट्रफिक पोलिसाला जाळले, माझे काय गेले?’ या लेखाच्या शेवटी मी दिलेली प्रतिक्रिया दक्षता जानेवारी २०११ च्या अंकात प्रकाशित करून मला शाबासकीची थाप दिली. छंद जोपासला की चांगलाच मार्ग सापडतो.’ या साहेबांच्या वाक्याने मी लिखाणाकडे व कवितेकडे वळलो. त्यांच्या आशीर्वादाने पुढे माझ्या कविता आणि लेख, उत्कृष्ट तपास कथा प्रकाशित झाल्या.

२०१४ मध्ये रायगड जिल्ह्यात म्हसाळा पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असताना कुटुंबापासून दूर असल्याने मुलांच्या शिक्षणाकडे मला लक्ष देणं फारसं जमत नव्हतं. परंतु पत्नीने ही जबाबदारीही हसत हसत पार पाडली. ‘आपण नोकरीत चांगले लक्ष घाला, सर्व काही ठीक होईल,’ या तिच्या शब्दाने माझ्यात शंभर हत्तीचं बळ संचारल्यासारखं वाटत असे. अखेर २०१८ मध्ये मुलगी नम्रता हिने ‘डॉक्टर’ पदवी प्राप्त केली. आमचा आनंद गगनात मावेनासा झाला. एका वर्षांच्या खासगी प्रक्टिसनंतर डॉ. नम्रता हिची ठाणे महापालिका, ठाणे येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून निवड झाली.

यावेळी मात्र पत्नीच्या चेहन्यावर आनंदाऐवजी पुसटस भीतीच सावट दिसू लागलं. मला आणि मुलीला कोरोनाकर्तव्य बजावण्यासाठी घराबाहेर पडताना पत्नीच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती. मी तिला धीर देत म्हणालो, “जे असे दुसऱ्यांसाठी चांगले काम करतात त्यांची देवच काळजी घेतो, असा धीर सोडू नकोस, सर्व काही ठीक होईल.” आणि बघता बघता वर्ष निघून गेलं. पालघर जिल्हा पोलीस कार्यालयात डॉ. नम्रता हिचा कोरोना योद्धा म्हणून अपर पोलीस अधीक्षक श्री. विक्रांत देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

माझ्या संपूर्ण कारकिर्दीत पडलेला एक प्रसंग मला प्रकर्षाने आठवतो. तो दिवस होता. ३१ ऑक्टोबर २००४ रमजान महिना चालू होता. मुसलमान बांधव नमाज पढून एकमेकांना शुभेच्छा देत होते. तेवढ्यात एक मुस्लिम महिला आक्रोश करत वाऱ्याच्या वेगाने नया नगर पोलीस चौकीत शिरली. ‘मै बर्बाद हो गई, मै बर्बाद हो गई, या अल्लाह, मेरे दोनो बच्चे…’ असे मोठ्याने बोलत असतानाच ती चक्कर येऊन खाली पडली, तिच्या पाठोपाठ दोन-तीन महिला आणि पुरुष चौकीत शिरले. सर्वच जोरजोरात आक्रोश करू लागले. पोलिसांनी सर्वांना मानसिक आधार दिला आणि काय प्रकार आहे हे प्रथम जाणून घेतले.

ती महिला शुद्धीवर आली तेव्हा समजलं की, तिला दोन लहान मुली होत्या. चार वर्षांची जोहरा व तीन वर्षांची सुलताना घरातून बेपत्ता झाल्या होत्या. हे प्रकरण अतिशय गंभीर व नाजूक होत. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तात्काळ तक्रार नोंदविली गेली. तत्कालीन पोलीस निरीक्षक राजन घुले यांनी फोनवरून तत्कालीन पोलीस अधीक्षक रामराव पवार, पोले यांना सविस्तर माहिती कळवली. या घटनेचा तपास माझ्याकडे देण्यात आला. आम्ही तात्काळ वेगवेगळ्या टीम्स तयार केल्या.

हरवलेल्या व्यक्तिचा शोध घेणं, हे आव्हानात्मक असतं पण कार्यतत्परता, मेहनत आणि अचूक निर्णय यांचा चांगला मेळ बसला की, गुन्हा उघडकीस येतोच. त्याप्रमाणे संपूर्ण मीरारोड परिसराला वेढा देऊन नाकाबंदी करण्यात आली. गुन्हेगारास मुली शहराबाहेर घेऊन जाणं शक्य होणार नाही यासाठी संपूर्ण शहरात पोलिसांचं जाळं विणण्यात आलं. वाहनांची आणि संशयित इसमांची कसून तपासणी सुरू झाली. दुसरा दिवस उजाडला. दुपारी अचानक दोन-अडीचशे मुस्लिम बांधव, महिलांसह व कार्यकर्त्यांसह पोलीस स्टेशनसमोर गर्दी करत आरडाओरडा करू लागले. ते पाहून मिसिंग मुलीचं काही बरंवाईट झालं नाही ना, असा विचारही मनात येऊन गेला. गर्दीतील एक जण म्हणाला, ‘सहाब सुना है बच्चे चुरानेवाली टोली मीरारोड में आई है.’ त्याला दुजोरा देत दुसरी व्यक्ती म्हणाली, ‘सुना है जादू-टोने के लिए बच्चे को ले कर भाग गये है. बच्चों को ढूंढों, साहेब…’ लोकांच्या भावना लक्षात येत होत्या. त्यांना शांत करण्याचा पोलीस प्रयत्न करत होते परंतु काही समाजकंटक जमावाचा फायदा घेत ‘मीरारोड बंद करो, पोलीसवाले मुर्दाबाद’ अशा घोषणा देऊन वातावरण तापवू लागले.

वरिष्ठांनी पोलीस ठाण्याच्या आवारात आणि मोक्याच्या ठिकाणी एसआरपी प्लॅटून आणि पोलीस तैनात केले. त्यानंतर मुस्लिम समाजाच्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा केली आणि जमाव शांत झाला. ‘आम्ही मुलींचा शोध घेऊन मुली त्यांच्या आईच्या ताब्यात सुखरूपपणे देऊ,’ असं पोलिसांनी आश्वासन दिलं होतं. पोलीस पुन्हा नव्या जोमाने व ताकदीने कामाला लागले आणि अखेर चार तासांनी पोलीस ठाण्यातील फोन खणाणला. पलीकडून एका अज्ञात इसमाने माहिती दिली, “तपास यादीतील मुलींचे जे फोटो दाखवले गेले होते, त्या दोन्ही मुली ‘बडा मशीद’ येथील पाठीमागच्या बाजूस गल्लीमध्ये गोणपाटावर बसल्या आहेत. “

पोलिसांनी तिथे धाव घेतली. दोन्ही लहान मुली सुखरूप होत्या. मुलीची आई प्रकृती बिघडल्याने हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होती. मुलींना पाहताच आईने त्यांना कडकडून मिठी मारली. घटना घडल्यानंतर २४ तासाच्या आत दोन्ही मुली आईच्या कुशीत विसावल्या होत्या. त्या महिलेने दोन्ही हात जोडत पोलिसांचे आभार मानले.

आता मी सेवानिवृत्त झालो आहे. यावेळी प्रथम ज्यांचं स्मरण होतंय ते म्हणजे माझे आईवडील. माझे वडील इच्छाराम गणेश वाघ हे नागपूर रेल्वे पोलीस दलात नोकरीस होते. त्यांनी पोलीस खात्यात चाळीस वर्ष सेवा केली. वडिलांप्रमाणे मलाही जवळजवळ चाळीस वर्ष पोलीससेवेचं भाग्य लाभलं.

‘फिट है तो हिट है,’ याप्रमाणे आजवर प्रकृती उत्तम सांभाळली. आता निवृत्तीनंतर पुढे काय, आपल्याला काहीतरी वेगळं करता येईल का, हे विचार डोक्यात घोळतच होते. Pay Back to the Society, इच्छा असेल तर मार्ग दिसेल यावर विश्वास ठेवला.

एके दिवशी सकाळी वॉक घेत असताना निवृत्त मुख्याध्यापक रमेश वाघमारे यांच्याशी भेट झाली. ओळख वाढली तेव्हा त्यांनी सांगितलं की, ‘समाजातील गरीब विद्याथ्र्यांना अभ्यासिका, वाचनालय, सभामंडप यासाठी मोक्याची जागा मिळावी म्हणून प्रा. भास्कर पैठणकर, जयश्री पैठणकर, सोनाली अहिरे, शुभांगी कांबळे, दिलीप लोंढे, मिलिंद जाधव, अश्विनी थोरात, पंडित वाघ, दिलीप पवार, अनिल अहिरे, अशोक सरवदे, मंगेश सावंत, किशोर सोनावणे अशी बरीचशी शिक्षक मंडळी मीरा-भाईंदर महानगरपालिका यांच्याकडे स्थानिक नगरसेविका श्रीमती अनिता मुखर्जी यांच्यामार्फत प्रयत्न करत आहेत. ‘काम जवळजवळ होण्यासारखे आहे. तुम्ही थोडा प्रयत्न केला तर गरीब विद्यार्थ्यांना मोफत अभ्यासिका मिळेल. हे पुण्याचे काम आहे.’ असे त्यांनी सांगितले.

‘प्रयत्नांती परमेश्वर’ यावर विश्वास ठेवून मी आणि माझी पत्नी आशा काही समाजबांधवांसह, मीरा-भाईंदर महानगरपालिका महापौर श्रीमती ज्योत्स्ना हसनाळे यांची भेट घेतली आणि विनंती केली. जुनी ओळख आणि त्यात पोलीस अधिकारी असल्याची भर पडली आणि आम्हा सर्वांच्या प्रयत्नांना यश आले. ‘फुले-शाहू-आंबेडकर प्रतिष्ठान, मीरारोड’ या नावाचा जन्म झाला. गरीब विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आणि वाचनालयाचं द्वार उघडलं गेलं. विद्यार्थ्यांना ३०x८० च्या लांबीरुंदीची मोठी वास्तू १०० आसनांसह उपलब्ध झाली.

या अभ्यासिकेत बघता बघता ५०, ६०, ७० अशी विद्यार्थी संख्या वाढू लागली. आता शिक्षकवर्गही पुढाकार घेऊ लागला. मुलांना मदत करण्यासाठी शिक्षिका शुभांगी कांबळे, ज्योती जाधव, मुख्याध्यापक रमेश वाघमारे यांच्यासह इतर शिक्षकही पुढाकार घेऊ लागले. आम्ही पती-पत्नींनी एक खारीचा वाटा उचलून शिक्षण क्षेत्राच्या उपक्रमाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. आज मुलांच्या निरागस चेहऱ्यावर शिक्षण घेतानाचा आनंद वाहताना दिसतो, तेव्हा निवृत्तीचा विशेष आनंद प्राप्त होतो! निवृत्तीनंतरही स्वतःची शान राखणाऱ्या खाकीचा अधिकच अभिमान वाटू लागतो!

Leave a Comment