सोलापूर : रस्त्यावर वाहने अडवून तसेच हातभट्टीवा ल्यानेचे पैसे घेणाऱ्या होमगार्डवर चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेंद्र किसन आयवळे (रा-सोलापूर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. श्रीकांत चंद्रकांत गायकवाड यांनी चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बंदोबस्तासाठी नियुक्त केलेला होमगार्ड वाहने थांबवून फेरीवाल्यांच्याकडून वसुली करत होता. पोलिस असल्याच्या भीतीने नागरिकांनीही त्याला पैसे दिले. फेरीवाल्यांना संशय येताच त्यांनी पोलीस ठाण्यात माहिती देऊन पोलिसांना पाचारण केले असता हा होमगार्ड असल्याचे समोर आले.
संशयित आरोपी होमगार्ड नरेंद्र आयवळे हा होमगार्डचा पोशाख घातलेला पोलिस असून त्यावर काळी जॅकेट घातले होते. त्यामुळे भीतीने वाहन चालक गाडी थांबवत होते. वाहनाची कागदपत्रे, आरसी बुक व परवाने दाखवले नाहीतर 500 रु., रस्त्यावर शेंगदाणे आणि आईस्क्रीम विकणाऱ्या व्यक्तीना इथे गाडी चालवायची नाही आणि इथे गाडी चालवायची असेल तर मला 500 रुपये दंड भरावा लागेल. असे सांगून पैसे उकळवत होता. होमगार्ड आयवळे यांनी पैसे घेतले मात्र शासनाची दिलेली पावती दिली नाही. पोलिसांसारखा दिसणारा हा माणूस पोलिस नसल्याचा संशय वाहन चालक व फेरीवाल्यांना आला.
बिट मार्शल यांनी घटनास्थळी येऊन त्या व्यक्तीची चौकशी केली असता तो पोलिस नसून नरेंद्र आयवळे नावाचा होमगार्ड असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पोलीस असल्याची भीती दाखवून वाहनधारक व आईस्क्रीम विक्रेत्याकडून पैसे उकळल्याप्रकरणी चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी होमगार्ड, विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.